वर्धा, दि.20 (जिमाका) : बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी श्री छाया बालगृह येथे चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक 27 ते 29 जानेवारी या कालावधीत श्री छाया बालगृह, नालवाडी यांचे मैदान येथे आयोजिन करण्यात आला आहे. महोत्सवात 6 ते 12 व 13 ते 18 वयोगटातील मुले, मुली यांचा सहभाग घेण्यात येणार असून कबड्डी, लंगडी, 100 मिटर धावणे, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, सॅक रेस, कॅरम, बुध्दीबळ, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगित खुर्ची, लिंबू चमचा व सांस्कृतीक कार्यक्रम व विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजयी स्पर्धकांना गुणानुक्रमे पारितोषिके व प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
वर्धा शहरातील शाळेच्या मुलां-मुलींनी शाळेमार्फत महोत्सवातील स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांची यादी शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, डॉ.अनुजा इखार यांची इमारत, हिरो शोरुम जवळ, मोहन नगर, नागपूर रोड, वर्धा या कार्यालयास खास दुताकरवी तसेच www.dwcdowardha@gmail.com या ई-मेल वर पाठविण्यात यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.






