बोरी कोकाटे येथे बळीराजा सन्मान सोहळा व कार्यशाळा
कालवे वितरण प्रणाली दुरुस्ती व नुतनीकरण कामाचे भूमीपूजन
वर्धा, ब्यूरो : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सामूहिक गट शेती तसेच कृषि प्रक्रिया उद्योग सुरु करावेत. यासाठी पोकरा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
सेलू तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथे नाविण्यपूर्ण प्रयोग करुन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी बळीराजा सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच पाटबंधारे विभागाच्यावतीने बोर व धाम प्रकल्पावरील कालव्याच्या वितरण प्रणालीच्या दुरुस्ती व नुतणीकरण कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार डॉ.मनिषा कायंदे, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲङ सुधीर कोठारी, विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाडगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नितू चव्हाण, तहसिलदार शंकुतला पाराजे, राजेश सराफ, अशोक कलोडे, अशोक मुडे, सहाय्यक अभियंता सतीश मोवाडे, घोराडच्या माजी सरपंच ज्योती घंगारे आदी उपस्थित होते.
जोपर्यंत शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत आधुनिक भारताचे स्वप्न साकार होऊ शकत नाही. शेतकरी आत्मनिभर व समृध्द व्हावा यासाठी शासनाच्यावतीने किसान सन्मान योजना, बळीराजा पांदन रस्ते योजना, बळीराजा मोफत वीज योजना आदी योजनांसोबतच विविध अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृध्द कसे करता येईल यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाविण्यपूर्ण शेती केल्यामुळे त्यांचा सन्मान राज्यस्तरावर झाला. त्यांचे अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करुन फळ, भाजीपाला लागवड करावी, असे पालकमंत्री म्हणाले.

राज्यात प्रथमच दुरुस्तीच्या कामासाठी 284 कोटी मंजूर
सेलू तालुक्यातील बोर व धाम प्रकल्पाचे कालवे वितरण प्रणाली 40 वर्ष जुनी असल्याने दोषपूर्ण झाली होती. त्यामुळे कालव्यातून बरेचशे पाणी पाझरामुळे वाया जात होते. यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर कमी पाणी पाहोचत असल्याने सिंचन क्षमता कमी झाली होती. बोर प्रकल्पातील कालवा प्रणाली दुरुस्तीसाठी 148 कोटी व धाम प्रकल्पातील कालवा वितरण प्रणाली दुरुस्तीसाठी 136 कोटी असे 284 कोटी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कालवा दुरुस्तीच्या कामासाठी मंजूर केलेले आहे.
या कामामुळे बोर प्रकल्पातील 77 गावे व धाम प्रकल्पामुळे 48 गावांना लाभ मिळणार आहे. बोर प्रकल्पातील 12 हजार 194 हेक्टर क्षेत्र व धाम प्रकल्पातील 6 हजार 90 हेक्टर क्षेत्र सिंचन पुन:स्थापित होणार असल्याने सेलू, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत सिंचनासाठी लाभ घेऊन त्यांना सुगीचे दिवस येईल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
युवा शेतकरी शेतामध्ये नाविण्यपूर्ण शेती करीत आहे. अशा शेतकऱ्यांचा सन्मान ही आनंदाची बाब आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना सुध्दा प्रोत्साहन मिळेल. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये महिला शेतकरी सन्मान विधेयक पारीत झाले असून यामुळे महिला शेतकऱ्यांना सन्मान मिळणार असल्याचे आ.कायंदे म्हणाल्या.
यावेळी सुधीर कोठारी, उमेश घाडगे, अशोक कलोडे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते फळशेती, फुलशेती, भाजीपाला शेती, रेशीम शेती करणाऱ्या तसेच तेल युनिट उभे करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद उपरीकर यांनी केले.
तत्पुवी बोर प्रकल्पाजवळील कालवा वितरण प्रणालीचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी भूमीपूजन व बोर प्रकल्प परिसरात पर्यंटकासाठी लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे दिव्याचे लोकार्पण तसेच केळी उत्पादक शेतक-यांच्या अभ्यास दौरा वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.






