सावंगी रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनी विविध उपक्रम
क्षयरोग निर्मूलनात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा – डॉ. बाबाजी घेवडे

वर्धा – क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, मात्र या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, असे मत सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील श्वसनरोग विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र क्षयरोग टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे यांनी जागतिक क्षयरोग दिवस कार्यक्रमात व्यक्त केले.
सावंगी रुग्णालयातील हिप्पोक्रेटस सभागृहात श्वसनरोग व सामुदायिक औषधीशास्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जनजागृतीपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर होते. यावेळी, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. उल्हास जाधव, सामुदायिक औषधीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सोनाली चौधरी, डॉ. स्वरुपा चकोले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. बाबाजी घेवडे यांनी क्षयरोगाचा इतिहास, लक्षणे, उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन केले. क्षयरोगासंबंधित समाजातील गैरसमज आता कमी होत असून जीन एक्स्पर्टसारख्या आधुनिक चाचण्यांद्वारे जलद निदान करून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुचविण्यात आलेल्या पद्धतीने उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे डाॅ. घेवडे म्हणाले. मृत्यूसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेल्या क्षयरोगाचे जगभरातून निर्मूलन करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच व्यापक जनजागृतीची गरज आहे, असे मत यावेळी संजय इंगळे तिगावकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात क्षयरोगासंबंधी शोधप्रबंधासाठी अनुदान प्राप्त झालेले डॉ. अश्विन करनान, डॉ. शिवकिरण रेड्डी, डॉ. प्राजक्ता घेवडे, डॉ. हर्षित रेड्डी या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा, नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, भित्तिपत्रक निर्मिती आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमिषा सोनी व डॉ. सृष्टी जैन यांनी केले.
या आयोजनात डॉ. विवेक अलोने, डॉ. जावेद शेख, डॉट्स सेंटरचे मंगेश खोंडे, रूपेश बिजमवार, स्मिता नाईक, ममता मेघे, अभिनय वाकोडे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. वैद्यकीय शिक्षण व संशोधन आणि आरोग्य सेवा या दोन्ही स्तरावर हा उपक्रम महत्त्वाचा आहे, अशा सदिच्छा जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. अभय गायधने व सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डाॅ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal