वर्धा. दि.14 : निर्सगाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतक-यांना आधुनिक तंत्र ज्ञानाची व मार्गदर्शनाची जोड मिळावी व त्यांच्या उत्पन्नत वाढ व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री जिल्ह्यातील 200 शेतक-यांना शेतीच्या आधुनिक अभ्यासासाठी बारामतीला घेऊन जाणार आहे.या अभया दौ-साठी शेतकरी रविवार दि. 16 फेब्रुवारीला रवाना होणार आहे.
मागील तीन दशकांपासून जिल्ह्यातील शेतकरी विविध संकटांनी घेरलेला आहे. निर्सगाच्या संकटामुळे उत्पन्नावार परिणाम होत आहे. शेतक-यांनी राब राब राबून देखील त्यांच्या पदरी काहीच पडत नाही. अशातच मागील काही वर्षात शेतक-यांच्या आत्महत्येचा कलंक जिल्ह्याला मिळाला आहे. निर्सगाचा लहरीपणा व पारंपारिक शेतीची छेद देऊन आधुनिक पद्धतीने शेती करणा-याचा पर्यायच शेतक-यांना पुढे आता राहिलेला आहे. शेतीसोबतच जोड धंदा करणे देखील आवश्यक झाले आहे. हिच बाब लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यातील शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व त्यांना दुग्ध, कुक्क्ट पालन व अन्य शेतीशी संबंधित व्यवसायाची माहिती मिळावी, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला असून दोनशे पुरूष व महिला शेतकरी अभ्यासासाठी जाणार आहे. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शेतकरी बारामती येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत् कार्यरत कृषी विज्ञान केंद्राला सोमवारी दि. 17 फेब्रुवारीला भेट देणार आहे. शेतक-यांसोबत पालकमंत्री देखील उपस्थित राहणार आहे. सकाळी 9.30 वाजता एफ.पी.ओ. आणि स्मार्ट मॅग्नेट कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी विशेषज्ञ डॉ. धिरज शिंदे, संतोष गोडसे व डॉ. मिलींद जोशी शेतक-यांना मार्गदर्शन करतील. सकाळी 11 वाजता के.व्ही. के प्रक्षेत्र पाहणी, फुलशेती, भाजीपाला प्रात्यक्षिके, एआय तंत्रज्ञान ऊस लागवड, जैविक उत्पादन प्रयोगशाळा, पाणी साठवणूक, शेळीपालन, भाजीपाला नर्सरी, फळपीक नर्सरी, मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन आदी बद्दल संतोष गोडसे व आकाश वालकुंडे मार्गदर्शन् करतील. दुपारी 2 वाजता दुग्ध डेअरीला शेतकरी भेट देतील. यावेळी आकाश वालकुंडे व डॉ. डी.पी. भोईटे माहिती देतील. अजैविक तण व्यवस्थापन संदर्भात तज्ञ माहिती देणार आहे. 18 फेब्रुवारीला शेतकरी जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडला भेट देऊन मायक्रो सिंचन प्रणालीची माहिती जाणून घेणार आहे.
पीकेव्हीच्या तज्ञांशी केली होती पालकमंत्री भोयर यांनी चर्चा
जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा पालकमंत्री भोयर यांनी चंग बांधला आहे. त्याअनुषंगाने त्यांनी मागील आठवडयात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट देऊन तेथील तज्ञांशी चर्चा केली होती. जिल्ह्यातील शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात यावे व त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याची सूचना केली होती. आत पालकमंत्री भोयर यांनी शेतक-यांना थेट अभ्यासाठी बारामतीला नेण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतक-यांना होणार फायदा
जिल्ह्यातील शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन् मिळावे यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे शेतक-यांना नक्कीच फायदा होणार आहे. शेती सोबतच दुग्ध व्यवसाय, कुक्कट, मत्स्य पालन, फळबाग, भाजीपाला व अन्य शेती विषयक बाबींची माहिती मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. शेतक-यांना नवीन तंत्रज्ञान स्विकारून आधुनिक शेती करून आपले उत्पन्न वाढवावे, हाच मुख्य हेतू असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
