अमरावती प्रतिनिधी:
रामा (अफजलपूर), ता. भातकुली येथील बहुचर्चित हत्येच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. सुनील अविनाश देशमुख यांनी केलेला अत्यंत आक्रमक, अभ्यासपूर्ण आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम युक्तिवाद निर्णायक ठरला आहे. ॲड. सुनील देशमुख यांनी मांडलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश यशवंत गोस्वामी (कोर्ट क्र. २) यांनी आरोपी रामदास सरोदे व संदीप सरोदे या पिता-पुत्राला भा.दं.वि. कलम ३०२ सह ३४ अंतर्गत दोषी ठरवून आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली.

काय घडले होते प्रकरण?
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी रामा (अफजलपूर) येथे सांडपाण्याच्या जुन्या वादावरून आरोपींनी रामकृष्ण निघोट यांच्यावर लोखंडी सब्बलने प्राणघातक हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली होती. वलगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
ॲड. सुनील देशमुख यांच्या युक्तिवादाची प्रमुख वैशिष्ट्ये:
सदर गंभीर खटल्यादरम्यान अति. शासकीय अभियोक्ता ॲड. सुनील देशमुख यांनी एकूण १० साक्षीदार न्यायालयात तपासले. मृतकाची चिमुकली मुलगी रूहानिका व पत्नी स्वाती निघोट यांची प्रत्यक्षदर्शी साक्ष, तसेच वैद्यकीय व तपासाधिकाऱ्यांच्या पुराव्यांची साखळी ॲड. सुनील देशमुख यांनी अत्यंत कौशल्याने आणि तर्कशुद्ध रीतीने न्यायालयासमोर मांडली. आरोपींनी अत्यंत निर्दयपणे हा गुन्हा केल्याचे आणि यात कसलीही शंका उरली नसल्याचे सिद्ध करण्यात ॲड. सुनील देशमुख पूर्णपणे यशस्वी ठरले.
ॲड. सुनील देशमुख यांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच पीडित स्वाती निघोट यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. या प्रकरणात पोलीस निरिक्षक सुरेंद्र अहेरकर, म.पो.उपनि. अविद्या शिरसाठ यांनी तपास केला असून कोर्ट पैरवी म्हणून ए.एस.आय. विनोद कनोजिया यांनी सहकार्य केले.






