उद्या ऋषिराज कुलकर्णी यांचे वाद्यसंगीत सादरीकरण
वर्धा – उस्ताद झाकिर हुसैन यांचे शिष्य ऋषिराज कुलकर्णी यांचे हस्तनिर्मित वाद्ययंत्रांवरील संगीत सादरीकरण व संवाद मैफलीचे शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक मगन संग्रहालयात आयोजन करण्यात आले आहे.
सध्या ऋषिराज कुलकर्णी हे ‘खोया मैं… इंडिया टूर’ हा उपक्रम देशभर राबवित असून यात देशविदेशातील विविध हस्तनिर्मित वाद्ययंत्रांवर वैविध्यपूर्ण संगीत सादर करीत असतात.
ऋषिराज कुलकर्णी यांना उस्ताद झाकीर हुसेन व पं. योगेश सामसी यांचे मार्गदर्शन लाभले असून ए.आर. रहमानच्या केएम म्युझिक कंझर्व्हेटरीचे ते विद्यार्थी आहेत. ऋषिराजचे होम आणि द वुड्स असे दोन म्युझिक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. या कार्यक्रमात ऋषिराज कुलकर्णी हॅन्डपॅन, राव वस्त, तबला व अन्य वाद्ययंत्रांच्या सहाय्याने निसर्ग संगीत सादर करणार आहे. हा कार्यक्रम दिवंगत तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित असून संगीतप्रेमींनी यात सहभागी होण्याचे आवाहन मगन संग्रहालय समितीद्वारे करण्यात आले आहे.
