लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची कुटुंबात, समाजात भागिदारी वाढली -पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
                                                    

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहण

जिल्ह्यात 83 हजार शेतकऱ्यांना 63 कोटीची विज बील माफी

1 हजार 661 युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण

वयोश्री योजनेतून 8 हजार 622 वयोवृद्धांना अर्थसहाय्य

वर्धा, दि.1: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. महिलांच्या आत्मसन्मानासोबतच त्यांची कुटुंबातील भागिदारी वाढविण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे. जिल्ह्यात 3 लाख 11 हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जात असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रिडा संकुल येथे पालकमंत्र्याच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकरी श्रीपती मोरे उपस्थित होते. सुरुवातीस पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या तसेच स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेसाठी शहीद झालेल्या बांधवांना अभिवादन केले.

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर विकासाच्याबाबतीत आपण सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेला आपला जिल्हा देखील विकासाच्या बाबतीत मागे राहिलेला नाही. जिल्ह्यात विकासाचे विविध कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना वीज बिलाच्या भारातून मुक्त करण्यासाठी शासनाने नुकतीच ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ सुरु केली. जिल्ह्यात या योजनेतून 83 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 63 कोटी विज बिल माफी देण्यात आली आहे. गेल्या खरीप हंगामात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या 1 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 114 कोटीचा मोबदला आपण नुकताच वितरीत केला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने केली होती. यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांना 61 कोटींचे सहाय्य देण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेंतर्गत प्रत्येकवर्षी 12 हजार रुपयांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 661 युवक युवतींना प्रशिक्षण दिले जात आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत यावर्षी 481 नवीन प्रकल्प मंजूर करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात 490 प्रकल्पांना आपण मंजूरी दिली. आपण नुकतीच जिल्ह्याची गुंतणुक परिषद घेतली. या परिषदेत 45 सामंजस्य करार झाले. यातून 1 हजार 247 कोटीची गुंतवणुक होणार असून 3 हजार 314 तरुणांना रोजगार मिळणार आहे. जलजीवन मिशन योजनेतून 2 लाख 38 हजार कुटुंबांपैकी 2 लाख 34 हजार कुटुंबांना घरगुती नळ जोडणी देण्यात आलेली आहे.

शासनाचे प्रत्येकाच्या घराचे स्वप्न पुर्ण करण्याचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 मध्ये जिल्ह्यात 17 हजारावर घरकुले मंजूर करण्यात आली होती. टप्पा 2 मध्ये 19 हजार 433 घरकुले मंजूर झाली आहे. याशिवाय विविध आवास योजनेतून विविध घटकांसाठी घरकुले बांधली जात आहेत. वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळातील गरजा भागविण्यासाठी एकरकमी 3 हजार रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाने सुरु केली. या योजनेतून 8 हजार 622 वयोवृद्धांना अर्थसहाय्य देण्यात आले आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून 950 ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनाचा लाभ देण्यात आला.          

शासनाच्या लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तर तिच्या 18 वर्षापर्यंत 1 लक्ष 1 हजार रुपये प्रदान केले जातात. जिल्ह्यातील 3 हजार 526 लेकींना 1 कोटी 76 लाखाचा लाभ देण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा उपक्रम आपण जिल्ह्यात राबवितो आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 8 शाळा आदर्श करीत असुन त्यासाठी पर्याप्त निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यात पिएम श्री शाळा योजनेंतर्गत एकुण 17 शाळांची निवड करण्यात आली आहे. असुन शाळांच्या सातत्यपुर्ण विकासाबरोबर मुख्याध्यापक व शिक्षक यांना सक्षमीकरणासाठी – सुध्दा नियोजन करण्यात आलेले आहे.               

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 4 लक्ष 91 हजार आरोग्य कार्ड वाटप करण्यात आलेले आहेत. वर्धा, हिंगणघाट व देवळी शहरात एकुण 57 लोकेशनवर 240 सीसीटीव्ही कॅमेरे आपण बसविले आहे. यामुळे शहरांच्या सुरक्षेत वाढ होणार असल्याचे पालकमंत्री डॅा.पंकज भोयर म्हणाले.

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली तसेच परेडचे संचलन करण्यात आले. पालकमंत्र्यांच्याहस्ते यावेळी माजी सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. उल्लेखनिय यश मिळविलेल्यांसह उत्तम कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख अधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal