वर्धा दि. २४ :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्याच्या सर्व सीमेवर कडक तपासणी मोहिम राबविण्यात यावी. बँकेतील मोठ्या व्यवहारावर लक्ष ठेवावे तसेच मतदारांना भेट वस्तूंचे व मद्याचे वाटप भरारी पथकांनी बारिक लक्ष ठेवावे अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानेंद्रकुमार त्रिपाठी यांनी दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपजिल्हाधिकारी निवडणूक अनिल गावित व निवडणूक विषयक नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणूक खर्च, वस्तू व सेवा कर, आयकर, बँक, उत्पादन शुल्क, माध्यम प्रमाणीकरण या विषयाचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना ४० लाख रुपये खर्चाची मर्यादा आखून दिली असून यापेक्षा जास्त आढळून आल्यास कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. आचारसंहिता काळात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमध्ये होणाऱ्या मोठ्या रकमेच्या व्यवहारावर सुध्दा लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
वर्धा जिल्हा दारूबंदी असला तरी अन्य जिल्ह्यातुन होणाऱ्या दारू पुरवठ्यावर उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांना प्रलोभने देण्याचे प्रकार निवडणुकीत होत असतात यावर सुध्दा भरारी पथकाने सूक्ष्म नजर ठेवावी असे ते म्हणाले. याबाबत केलेल्या कार्यवाहीची अद्ययावत माहिती संकेतस्थळावर टाकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना कुठल्याही माध्यमात प्रचाराची जाहिरात करण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी आवश्यक असून त्याचा खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्च खात्यात जमा करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
सोशल मिडियावर सायबर सेलची नजर राहणार असून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. निवडणूक काळात रोख रकमेचे वहन आयोगाने निर्बंध घातले असून नागरिकांनी मोठी रोख रक्कम बाळगतांना त्याअनुषंगाने पुरावा सोबत ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करतांना सामान्य माणूसाल विनाकारण त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.