वर्धा, दि.16 (जिमाका) : निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला असून आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आदर्श आचार संहितेचे विभाग प्रमुख व नोडल अधिका-यांनी आयोगाच्या मार्गदशक सुचनानुसार कसोशिने पालन करुन आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी विभाग प्रमुख व नोडल अधिका-यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अंमलबजावणीकरीता विभाग प्रमुख व जिल्हास्तरीय नोडल अधिका-यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत व सर्व विभाग प्रमुख व नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनानुसार अनधिकृत विनापरवाणगी करण्यात आलेले शासकीय इमारत, इमारत असलेले आवार, आवारांची संरक्षक भिंत यावरील विद्रूपीकरण इमारतीवरील झेंडे, लेखन लावण्यात आलेले पोस्टर्स, भिंती पत्रके, बॅनर्स आदी 24 तासात काढून घ्यावे. त्याचबरोबर नगर पालिका क्षेत्रातील नगर पालिकांनी व ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींनी सार्वजनिक मालकीच्या इमारती, परिसरातील अनधिकृत राजकीय जाहिराती, झेंडे, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, भिंती पत्रके, बॅनर्स आदी 48 तासात काढून घ्यावे. तसेच स्थानिक नियमावली, कायदे, न्यायालयाचे निर्देशाचे अधिन राहून सर्व अनधिकृत विनापरवाणगी लावण्यात आलेल्या राजकीय जाहिराती आचार संहित लागू झाल्यापासुन 72 तासात काढून घ्याव्या. अशा सुचना राहुल कर्डिले यांनी दिल्या.
आचार संहिता कालावधीत राजकीय पक्ष, उमेदवार यांनी शासकीय व निमशासकीय वाहने प्रचारासाठी, निवडणूकीच्या कामकाजाकरीता वापरण्यास सक्त मनाई असल्यामुळे संबंधीत विभाग प्रमुखानी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकरीता 24 तासात कार्यवाही करावी. शासकीय रक्कमेतून योजनांच्या जाहिराती, बातम्या याची प्रसिध्दी करु नये. त्याचबरोबर शासकिय विभागाच्या संकेत स्थळावर राजकिय पदाधिका-यांचे असलेले फोटो तातडीने काढून घ्यावे.
शासकीय, निमशासकीय यंत्रणांनी तातडीने त्यांचे विभागामार्फत, खात्यामार्फत सुरू असलेली विकास कामे व बांधकामे तसेच अद्याप सुरू न झालेली विकास कामे व बांधकामे यांची सविस्तर यादी तयार करून कार्यारंभ आदेश नोंदवही दिनांकित स्वाक्षरी करून बंद करावी व कार्यारंभ आदेश नोंदवही यादीसह प्रमाणित करून निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी, आचारसंहिता अंमलबजावणी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे सादर करावी. अशा सुचना यावेळी राहुल कर्डिले यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या.