वर्धा – सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवाचा आरंभ बुधवार, दि. २७ रोजी गणरायाच्या आगमनाने होणार आहे. सावंगीच्या शैक्षणिक परिसरात आयोजित या पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ज्ञानविज्ञान प्रदर्शनी, विविध आरोग्य शिबिरे आदींचे वैविध्यपूर्ण आयोजन नागरिकांसाठी करण्यात आले आहे.
सावंगी येथे बुधवारी सकाळी १० वाजता कुलपती दत्ता मेघे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगणेशाची स्थापना होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता आरोग्यम् धनसंपदा या ज्ञानविज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. यावर्षी गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये दररोज सकाळी ‘एक पेड मां के नाम’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते होईल. अभिमत विद्यापीठांतर्गत कार्यान्वित अकरा महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत दररोज वृक्षारोपण करतील.
या महोत्सवानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग असलेले विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर, सायंकालीन सत्रात विविध प्रांतातील लोककला, संगीत रजनी, नाटिका, नृत्य व अन्य कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. संगीतप्रेमींसाठी विशेष आकर्षण असलेली स्वरवैदर्भी लिटिल चॅम्प विदर्भस्तरीय सिनेगीत गायन अंतिम स्पर्धा शनिवार, दि. ३० ला सायंकाळी ७ वाजता होणार असून विदर्भातील प्रतिभावंत बालकुमार गायक गायिका यात सहभागी होणार आहेत.
गणेशोत्सवादरम्यान दहा दिवसांच्या काळात नागरिकांसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटर, महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय, शरद पवार दंत रुग्णालय यांच्याद्वारे विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी जनजागृतीपर कार्यक्रमांचा तसेच आरोग्यदायी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डाॅ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, प्रशासकीय महासंचालक डाॅ. राजीव बोरले, विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर, रुग्णालय समूह संचालक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर व आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.

