वर्धा : सेलू व वर्धा तालुक्यातील काही भागात दिनांक १८ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्त सेलू तालुक्यातील मदनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात नदीचे पाणी साचून झालेल्या नुकसानीची तसेच वर्धा तालुक्यातील आंजी येथील गावात नदीला पूर आल्यामुळे गावातील घरांच्या झालेल्या नुकसानीची पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी पाहणी केली. ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक यांनी एकत्रितरित्या पंचनामे करुन तत्काळ प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी मदनी येथील गौरव गावंडे या शेतकऱ्यांच्या शेतपिकाची पाहणी करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी पांदन रस्त्याची मागणी केली. राज्य शासनाने बळीराजा पांदन रस्ते योजना सुरु केली आहे. या योजनेमधून रस्ता लवकरच मंजूर करण्यात येईल. यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही यावेळी अधिका-यांना दिल्या. मदनी परिसरातील ३१ हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले असल्याचे यावेळी कृषि विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मदनी येथील पाहणी दरम्यान सेलूचे तहसिलदार मलीक विराणी, नायब तहसिलदार श्री.किरसान, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.चोपडे, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व गावकरी उपस्थित होते.
आंजी येथील धाम नदीला पूर आल्याने नदीकाठावरील घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करतांना डॉ. पंकज भोयर यांनी नुकसानग्रस्त घरमालकांना तत्काळ घरकुल मंजूर करण्याच्या सूचना देऊन जलसंपदा विभागाने धाम नदी प्रकल्पापासून येळाकेळी पर्यंत नदीच्या संरक्षण भिंतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना केल्यात. त्याचबरोबर नदीच्या खोलीकरणाचे व गाळ काढण्याचे प्रस्ताव सादर करावे, अशाही सूचना श्री. भोयर यांनी केल्या. यावेळी वर्धाचे तहसिलदार संदीप पुंडेकर, संदीप दाबेराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे, सुनील गफाट, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






