जीवंत सातबारा मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ
10 मे पर्यंत राबविणार येणार मोहिम
वर्धा,: मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकजासाठी आवश्यक असणा-या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद अभिलेखामध्ये विहित कालावधीत न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जीवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेस शेतक-यांनी सहकार्य करावे असे, आवाहन जीवंत सातबारा मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात 1 एप्रिल ते 10 मे 2025 या कालावधीत जिवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ सेलू तालुक्यातील येळाकेळी येथे करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसिलदार मलीक विराणी, नायब तहसिलदार श्री. किरसान, येळाकेळीच्या सरपंच भारती चलाख, पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सयाजी महाराज, मंडळ अधिकारी श्री. कुटे आदी उपस्थित होते.
मोहिमेअंतर्गत मयत शेतक-यांचे 7/12 अभिलेख्यांवर असलेले नाव कमी करुन त्यांचे वारसदार यांची नावे 7/12 अभिलेख्यांवर नोंदविण्यात येणार असुन यासाठी पात्र शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन वान्मथी सी यांनी केले आहे.
मोहिमे दरम्यान दि.1 ते 5 एप्रिल या कालावधीत ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत त्यांच्या साजा अंतर्गत येणा-या गावामध्ये चावडी वाचन करुन न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडून गाव निहाय मयत खातेदार यांची यादी तयार करण्यात येणार आहे. दि.6 ते 20 एप्रिल या कालावधीत वारसांसबंधी आवश्यक कागदपत्रे यामध्ये मृत्यु दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख, स्वंय घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा, सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दुरध्वनी क्रमांक भमणध्वनी क्रमांक रहिवास बाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी यांच्या कडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी स्थानिक चौकशी करण्याचे काम मोहिमेत करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे ॲग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी, संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेची कामे आणि राशन कार्ड धारकांचे ई-केवायसी करणे अशी विविध कामे शिबिरात करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हसते ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेल्या शेतक-यांना प्रमाणपत्र, ई-राशन कार्ड, संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला येळाकेळी येथील माजी पंचायत समिती सदस्य बंडू गव्हाळे, तलाठी, ग्राम सेवक, कृषि सेवक, शेतकरी, लाभार्थी उपस्थित होते.
