लाखो लोकांसाठी आदरणीय दत्ता मेघे साहेब हे मोठे नेते, आमदार, खासदार, मंत्री, विद्यापीठाचे कुलपती होते. मात्र माझ्यासाठी ते वडिलांसारखे होते. त्यांना आणि त्यांचे सामाजिक काम पाहतच मी लहाणाचा मोठा झालो. जसा जसा मी मोठा होत गेलो, तसा तसा श्री दत्ता मेघे साहेबांबद्दलचा माझा आदर अधिकच वृद्धिंगत होत गेला.आजच्या जगात देणाऱ्या हातांची फार कमतरता आहे. “खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे ” असे म्हटले गेले आहे. परंतु श्री मेघे साहेब यांच्या संपूर्ण आयुष्याकडे आणि त्यांच्या दातृत्वाकडे पाहिले, तर हे शब्द अत्यंत समर्पक वाटतात. कारण त्यांनी आयुष्यभर देण्यातच आपले जीवन व्यतीत केले.
दानशूरता हा शब्द श्री दत्ता मेघे साहेब यांच्यासाठी चपखल बसतो. मी आयुष्यात अनेक नेत्यांना बघीतले, यातील अनेक जण सुरुवातील अत्यंत सामान्य कुटुंबातून आले, पुढे धनाढ्य झाले.मात्र गरीबाबत फारशी कळकळ यातील अनेकांमध्ये मला दिसली नाही. मात्र त्या उलट मेघे साहेबांनी आपल्या आयुष्यात जे काही मिळवले, ते समाजाला परत करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी केवळ स्वतःचे राजकीय आणि सामाजिक आयुष्य उंचीवर नेले नाही, तर शेकडो लोकांचे जीवनमान उंचावले आणि अनेक कुटुंब उभे केले. कित्येक घराच्या चुली मेघे सांहेबामुळे पेटतात. राजकीय आयुष्यात त्यांनी अनेकांना नगरसेवकापासून आमदार, खासदार, मंत्री होण्याची संधी दिली; मात्र याचा किंचितही अहंकार त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी जाणवला नाही.
गेल्या अडीच दशकांपासून त्यांना अत्यंत जवळून पाहण्याची संधी मला मिळाली; त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या काळात त्यांनी कुणाचे मन दुखावले किंवा कुणावर रागावलेले मी कधीच पाहिले नाही. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनाही त्यांनी माफ केले. वेळप्रसंगी मदतीचा हातही पुढे केला;हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.
मला आजही आठवते, मी नववीत शिकत होतो. माझे वडील श्री गोकुल पांडे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया चे ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री वा .कों.गाणार साहेब यांचा नाणेतुला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात श्री दत्ता मेघे साहेब प्रमुख पाहुणे होते. तेव्हा मी पहिल्यांदा दत्ता मेघे साहेबांना पाहिले. त्याआधी त्यांच्या विषयी खूप ऐकले होते. शुभ्र वेशभूषा, वेळेचे काटेकोर पालन आणि अत्यंत साधेपणा..पहिल्याच भेटीत त्यांच्या व्यक्तीमत्वाने मला प्रभावित केले. त्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढतच गेला. शैक्षणिक, आरोग्य तसेच गरजूंना मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावाचा माझ्या जिवनावर खोलवर प्रभाव पडला.
प्रत्येक व्यक्तीचे दुःख आणि वेदना समजून घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्यामुळेच मी त्यांच्याशी कायमचा जोडला गेलो. मलाही समाजसेवा केली पाहीजे असे वाटले. किंबहूना त्यांच्यापासून मला समाजसेवेची प्रेरणा मिळाली. त्यांचे आणि माझे अडीच दशकांचे ऋणानुबंध होते. मात्र या काळात मी कधीच वैयक्तिक कामासाठी त्यांच्याकडे गेलो नाही. कारण मला वाटायचे की आमचे नाते निस्वार्थ आणि पवित्रच राहिले पाहिजे.अनेकजण आजही माझ्यावर टीका करतात की “तू काय साहेबांच्या मागे-पुढे फिरतोस, पण स्वताचे एकही काम करत नाहीस.” मात्र मला वाटते, ते आमच्या नात्याला कधीच समजू शकणार नाहीत. नफा-तोट्यापलीकडचे,स्वार्थापलिकडचे हे नाते होते.
दत्ता मेघे साहेब यांच्या नावाने एक समाजसेवी संस्था उभारण्याची इच्छा माझ्या मनात होती. मात्र त्याला ते परावनगी देतील का याबद्दल माझ्या मनात धाकधुक होती. शेवटी धाडस करून मी त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता परवानगी दिली आणि आशीर्वादही दिला. अशा प्रकारे “दत्ता मेघे विचार मंच”ची स्थापना सन 2006 ला झाली. यानंतर अनेकांनी त्यांच्या नावाने संस्था स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे परवानगी मागितली, पण त्यांनी स्पष्ट सांगितले की हा अधिकार त्यांनी केवळ मला दिला आहे. “वरुण प्रामाणिक आहे, तो माझ्या नावाचा गैरवापर करणार नाही,” हा विश्वास त्यांचा माझ्यावर होता. माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. त्यांचे विचार आणि आदर्शांनुसार या मंचाच्या माध्यमातून अविरत समाजकार्य सुरू आहे, आणि ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवण्याचे वचन मी त्यांना देतो.
एक प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर तरळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माझ्या वडीला द्वारे आयोजित कार्यक्रमात श्री दत्ता मेघे साहेब उपस्थित होते. त्यांनी मला विचारले, “तू इथे कसा?” मी उत्तर दिले, “गोकुल पांडे माझे वडील आहेत.” त्यांना हे माहित नव्हते. तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले, “वरुण तुमचा मुलगा आहे, हे मला माहित नव्हते; पण वरुणला मी माझा मुलगा मानला आहे. मी त्याला दत्तक घेतले आहे.” त्यांचे हे शब्द आजही माझ्या कानात घुमताहेत. तो माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आणि आशीर्वाद होता.
अशीच एक दूसरी आठवण आहे.एका भव्य सामाजिक कार्यक्रमात आपल्या भाषणा मधे मेघे साहेबांनी माझा नाव घेत म्हणाले की वरुण पांडे हा खुप चांगला मुलगा आहे व मी त्याला खुप प्रेम करतो व त्याला आपला मुलगा मानतो. त्यांचे हे कथन आज आठवण करताना माझ्या डोळ्याचे अश्रु धारा थाम्बत नाही आहे.
आदरणीय मेघे साहेब आपले आयुष्य परिपूर्णपणे जगले आणि मागे दोन विनम्र व संवेदनशील पुत्र श्री सागर मेघे आणि आमदार श्री समीर मेघे असा ठेवा ठेवून गेले. या दोघांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजसेवेचा मार्ग स्वीकारला आहे.जसे एक महान व्यक्तीचे पुत्र असावेत, तसेच त्यांचे दोन्ही पुत्र आहेत. त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांच्या हृदयातही लोकांबद्दल अपार प्रेम, वेदना, करुणा आणि समाजसेवेची प्रामाणिक भावना आहे. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कटिबद्धता हे गुण त्यांनी आपल्या वडिलांकडून आत्मसात केले आहेत. श्री सागर भाऊ व श्री समीर भाऊ
दोघेही आपल्या वडिलांनी दिलेल्या संस्कारांना आणि शिकवणीला कृतीत उतरवत, निरंतरपणे लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहेत. हे खरोखरच अत्यंत दुर्मिळ दृश्य आहे की एक महान पिता आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारे, तितकेच सुसंस्कारित आणि सेवाभावी दोन पुत्र, ही गोष्ट जगात फारच क्वचित पाहायला मिळते.
आज माननीय दत्ता मेघे साहेब आपल्यात नाहीत, आणि त्यांच्या जाण्याने पोरकेपणाची भावना मनात दाटून येते. मात्र त्यांचे आदर्श, त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ, साधेपणा, विनम्रता आणि संवेदनशीलता मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. राजकारनात आता पुन्हा असा देवमाणूस होणार नाही.
साहेब मिस यू…
वरुण पांडे
संस्थापक अध्यक्ष
दत्ता मेघे विचार मंच






